मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०१५

खरंच कधी कधी स्वतःला फार असहाय समजतो मी . म्हणजे मी एखाद्या पक्ष , संघटनेत का आहे याचं कारण मलाच माहित ; हि बाब इतकी वरवर आणि धर्माशी निगडीत बिलकुल नाहीये ! माझ्या रोजगाराचा प्रश्न सोडवताना मला किती नाकी नऊ येतात ते मलाच माहित ! नोकरी आणि व्यवसायाच्या ' शुन्य ' संधीच्या घालमेलीत कुटुंबाचा तरुण पोरगा म्हणून जगणे फार कठीण आहे . जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा घरात पोळी-आणि मटन शिजतं एरवी घरात रोजच्या जेवणाची मारामार असते . हि वस्तुस्थिती आहे ; आणि तुमच्या समोर मांडण्यात लाज कसली म्हणून सांगितलं . कधीकधी इतकं फ्रस्ट्रेशन येतं कि निवडणुकीत मिळणारी दारू सर्व बंधनं झुगारून पितो मी ! रोजच निवडणुका असाव्यात असे मला वाटते त्यामुळे !
धर्माच्या नावावरच्या राजकारणाचा मुद्दा परवापासून …नव्हे खूप पूर्वीपासूनच ऐकतो आहे मी . ( भाजप , शिवसेना , एम . आय. एम . वगैरे ) आणि मला हेही माहित आहे कि ह्याच विकृत राजकारणामुळे कित्येक गरिबांच्या वाल्यांचे बळी माझ्यासारख्याच तरुणांकडून घेतले गेले आहेत . अगदी तुकोबांपासून ते कलबुर्गी सरांपर्यंत ! मी 'त्या' संघटना व पक्षात ' का आहे याचा विचार कुणीच करत नाही . फक्त माझ्या कृत्यावर ताशेरे ओढले जातात . मग माझ्यासारखे तरुण जेव्हा पोलिसांच्या तावडीत सापडतात तेव्हा माझ्या आड्नावांवरून मला छळले जाते . यावेळी हे पक्ष आणि संघटना सोयीस्करपणे माझ्याकडे पाठ फिरवतात . सुरुवातीला ते सांगतात कि , तू हे कृत्य कर , काही होणार नाही , योग्य प्लान केला आहे ; आणि जरी काही झालेच तर तुला सोडवण्यासाठी सर्व बेकायदेशीर आणि कायदेशीर पळवाटा शोधून तुला बाहेर काढू ! झालेच तर तुझ्या सर्व कुटुंबियांची जबाबदारी आमची ! मी किंवा माझ्यासारखा दुसरा कुणीतरी बेरोजगार तरुण जेव्हा ह्या ' ब्रेन वाशिंग 'ला बळी पडतो तेव्हा घटना घडल्यानंतर खूप पश्चाताप करतो . आपल्या हातून गरिबांचे कैवारी मारले जात आहेत याचे शल्य आयुष्यभर जात नाही ! रात्रीची खूप भयानक स्वप्न पडतात . घराचा कर्ता तरुण पोरगा तुरुंगात असतो त्यावेळी कुटुंब काय करत असेल त्याची संबंधित पक्ष आणि संघटनेने काळजी घेतली असेल का? किंवा जसे मला वाऱ्यावर सोडले तसे माझ्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडले असेल का ? असे असंख्य प्रश्नांचे काहूर माझ्या मनात दाटते . 
माझी बेरोजगारी संपली तर आणि माझ्या कुटुंबाला रोजचा हमीने घास मिळाल्यास मी त्यांच्या ब्रेन वाशिंगला कशाला भिक घालतोय ! मला माहित आहे माझ्या शिवाजी राजानं कसं राज्य केलं . मला जेव्हा दुसऱ्या धर्मांच्या द्वेषाबाबत सांगितले जात होते ; तेव्हा मी त्यांना सांगितले कि माझा राजा तर असलं काही सांगत नाही मग माझ्या राजाच्या नावावर असलं का सांगताय ? तेव्हा ते म्हणाले कि हा बघ असा आहे इतिहास ! आणि मी मूर्ख होतो , मी कधीच माझ्या राजाचं चरित्र मन लावून वाचलं नाही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही ! जेव्हा जेव्हा ' धर्म संकटात आहे' अशी आज्ञा ( जशी एम . आय . एम . चे नेते कधी कधी देतात ! ) वरून यायची तेव्हा तेव्हा मी तलवार घेऊन बाहेर पडायचो ! माझ्या आजूबाजूला काहींच संकटांत - बिंकटात धर्म नसायचा ! माझे परधर्मीय शेजारी सुद्धा मला खुपदा मदत करतातच ! मग खूप दंगा व्हायचा आणि दोन्ही धर्मातली माणसं मारली जायची . त्याची आकडेवारी बघितली कि मग लक्षात यायचं कि ' बापरे , आम्हांला ज्या लोकांनी आज्ञा दिली होती त्यांच्या कुटुंबाला काहीच धक्का पोहोचला नाहीये परंतु शेजारच्या घरातील कर्तं पोरगं गेलेलं आहे .' मला एकाच वेळेला दुःख आणि राग यायचा ! मी समजायचो कि , मग ' ह्यांनी ' असं का वागायचं ? बांधू द्यावं ना अयोध्या मंदिर ; काय फरक पडतो वगैरे ! नंतरच्या काहीं दिवसांत जेव्हा अहवाल वाचनात यायचे तेव्हा सत्य समोर यायचं कि संबंधित दंगा अमुक आमक्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडवन्याचा प्लानच होता ! मग मी चुकचुकायचो . पण पश्चाताप करण्याशिवाय मी काहीच करू शकत नव्हतो ! पण तरीही मी ह्या लोकांना सोडत नव्हतो त्याची कारणे पुढे आहेत :- 
मी चौकात कधी कधी उभा राहतो तेव्हा बारीक - बारीक कारणांवरून रस्त्यावरून जाणार्या एखाद्या दुसर्या पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या हाणामारीतून माझे नेतेच मला सोडवतात . माझ्याकडून चुकून एक पोरगी छेडली गेली तेव्हा मला ह्या नेत्यांनीच वाचवले ! नंतर जेव्हा मी प्रेमात पडलो तेव्हा तिच्यावरील हक्कावरून जेव्हा जोरदार भांडणं झाली तेव्हा ह्या नेत्यांनीच पोलिसांना फोन केला . यामुळे मी खूपच बिनधास्तपणे बेकायदेशीर कृत्य करायचो आणि माझे नेते मला वाचवायचे ! पण याबदल्यात ते माझ्याकडून त्यांच्या कित्येक वाईट आणि बेकायदेशीर कामांना पूर्ण करून घेत असत ! आज मला खूप वाटत आहे कि मी जर छ . शिवाजी महाराजांचे चरित्र एकदा जरी वाचले असते तरी धर्माच्या नावावर संघटना आणि पक्ष चालवून स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्या लोकांच्या धूर्त चालीला कधीच भुललो नसतो ! मी कधीच रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीला छेडले नसते . कारण माझा राजा म्हणतो कि " अशीच आमची माय असती सुंदर रूपवती , आम्हीही झालो असतो सुंदर वदले छत्रपति " ! आज मला या गोष्टीची जबरदस्त जाणीव होते कि , रुबाबात सिग्नल तोडून, हेल्मेट न घालता जाणं , तुफान वेगात गाडी मारणं , मुलींच्या शाळा कॉलेजच्या रस्त्यावर थांबणं किंवा दुसऱ्या मंडळातल्या पोरांशी हाणामारी केली नसती तर पोलिस स्टेशनमधून कधीच दादा , अण्णा , बापू , भाऊ , साहेब वगैरेंना फोन करून ' सोडवा ' अशी विनंती करावी लागली नसती ! मी त्यांच्या मिन्ध्यात राहल्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाला घराबाहेर पडावे लागले . आज वाटते कि माझ्या शिवाजी राजानं वाघासारखं जागा असं का म्हटलं होतं ! राजाला हे अपेक्षित होतं कि , एकटे जरी असलो तरी वाघाच्या रुबाबात राहावं ! अन्यायाविरोधात पेटून उठावं ! अन्यायाविरोधात संघटीत व्हावं ! संकटात इतरांना मदत करावी या आणि आशा कित्येक गोष्टी …. ! झुंडीत तर कोल्हीहि शिकार करतात , रुबाब वाघाचाच ! माझा राजा वाघ होता वाघ ! 
आज खूप तीव्रतेने जाणवते आहे कि , छानचौकि बंगल्यात बसून ' धर्म ' संकटांत म्हणून बोम्बालणारे आजही छान छान गाड्यांमध्ये - बंगल्यांमध्ये आहेत पण मी कुठे आहे …. …. ? कारण मला शिवाजी महाराज कळले तेव्हा माझ्यात प्रचंड बदल झाला ! आणि हा बदल माझ्या नेत्याला सहन होईना . त्याने माझी बदनामी केली आणि चुकीच्या कारणावरून मला पोलिसांतसुद्धा दिले ! 
आजही मी बघतो शिवाजी महाराजांच्या नावावरून विकृत राजकारण करणारे दलाल आज दुसर्याच नवीन तरुण पोरांना घेऊन हिंडताहेत . माझी त्यांना हात जोडून विनंती आहे कि , तुमच्या नेत्याला एकदा तरी शिवचरीत्रातल्या गोष्टी विचारा जर त्याला माहित असेल तर जा त्याच्याबरोबर …. नाहीतर ओळखा कि हा पठ्ठा तुमचा वापर करून सोडणार आहे ! यासाठी पहिल्यांदा तुम्ही शिवचरित्र वाचा ; ते योग्य माणसाने लिहिले आहे का ते बघा पहिल्यांदा . कारण पुरंदरे आणि भांडारकर वाचनालयवाल्यांनी जेम्स लेनला चुकीची माहिती ; आणि त्यामुळे त्याच्याकडून विकृत लिहिले गेले ! लेखक शिवाजी महारांजाच्या न्यायाने जगतो आहे का ते पहा मग आपोआपच कळेल तुम्हांला ! 
।। जय शिवराय ।।
( हा निवेदक माणूस पूर्वीचा कट्टरवादी पक्षाचा , संघटनेचा म्हणजे संस्थेचा एक कार्यकर्ता होता . आता तो त्यांच्यात नाही ! )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा